Tuesday 13 September 2011

आपले देशप्रेम आणि भौगोलिक परिस्थिती


by फेस बुके on Saturday, August 6, 2011 at 6:23pm
आता मी काही कुणी राजकीय विश्लेषक नाही,हे आपणांस माहित आहेच.भारतवर्ष/हिंदुस्थान ही अर्थातच एक अर्थातच एक भौगोलिकदृष्ट्या समजून घेण्याची गोष्ट आहे.पूर्वीही अनेक छोटी मोठी राज्ये भांडत होतीच.मला तर वाटते भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र असल्यामुळे आणि एका बाजूला हिमालयासारखे मोठे डोंगर असल्यामुळे भारतीय लोकांना स्थलांतरित होणे फारसे जमले नसावे.कारण पूर्वीच्या काळी दळणवळणाची सोय होतीच कुठे? आता एखाददुसरा कोणी एवढा मोठा सागर किंवा हे विशाल पर्वत लांघून गेला असेल,तर तो तिकडेच अडकून पडला असण्याची शक्यता आहे.कारण वास्को द गामा किंवा हिंदुस्थानला येण्याच्या नादात चुकून अमेरिकेला जाऊन पोचलेला कोलंबस (चू.भू.देणे घेणे इतिहासात फारशी गती आपल्याला कधीच नव्हती)किंवा इतर तत्सम मनुष्याची जशी दखल इतिहासाने घेतली तशी ती त्या तत्सम हिंदुस्थानी मनुष्याचीही अर्थातच घेतली असती.आणि जे लोक हिमालयात गेले,ते म्हणजे एकतर या संसारातून मुक्त झाले,किंवा फार तर गिर्यारोहक झाले असावेत.थोडक्यात म्हणजे प्रचंड अंतर्विरोधांनी भरलेला हा देश परकीय आक्रमणाला अर्थातच बळी पडत गेला.कारण इथे सारेच एकमेकांचे शत्रू होते.म्हणून स्वप्रदेशातील लोकांशी गद्दारी करून यांनी आपल्याच राजे लोकांवर आक्रमण करून परकीयांचे मांडलिकत्व पत्करण्यात धन्यता मानली.या ठिकाणी अगदी निर्विवादपणे आपण म्हणू शकतो,की हिंदुस्थान हा भौगोलिकदृष्ट्या नैसर्गीक सीमारेषांमुळे बांधला गेलेला आणि अनेक छोट्या प्रदेशांचा मिळून बनलेला एक मोठा समूह होता,जो आज सुध्दा अर्थातच आहे.येथिल लोकांमध्ये आपसात फार प्रेम,बंधुभाव होता असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरावे! आज भारत किंवा हिंदुस्थान हा पूर्वी जसा होता तसाच तो आजही असंख्य अंतर्विरोधांनी भरलेला आहे.आणि हे विविध सीमावाद,भाषावाद,जाती,जमाती
,धर्म,पंथ वर्णभेद आपली राज्यघटना मोडून काढू शकली नाही.कारण स्पष्ट आहे-इथल्या बहुतांश लोकांना देशप्रेम कशाशी खातात,हे माहित नाही.कारण,ते अशिक्षित, अज्ञानी आहेत आणि त्यांना फक्त दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे.आणि जे सुस्थितीत आहेत,त्यांनी देशात विविध धर्माच्या आणि भेदाभेदांच्या नावावर स्वतःचे वर्चस्व सिध्द करण्याचा सपाटा चालवला आहे.कारण पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने मिळालेले वर्चस्व एक राज्यघटना काय खोडू शकेल अशा समजात ते वावरत असून घटना बदलण्याच्या गोष्टी अधूनमधून बोलत असतात.आणि यात सर्वात धूर्त एक वर्ग आहे पुढाऱ्यांचा-त्यांना तर ही  इतर दोन वर्गांची आजची जीवनपद्धती त्यांच्या पथ्यावर पडणारीच आहे ! आता धर्माकडे क्षणभर वळू कारण तो संवेदनशील मुद्दा आहे.तर एखाद दुसरा अपवाद वगळता भारतातील धर्मांनी आपल्याच धर्मातील लोकांचेही चांगले पाहिले नाही.म्हणून धर्म ही संकल्पना आज आज एका विचित्र अवस्थेला येऊन पोचली  आहे.त्यामुळे कोणताही धार्मिक मुद्दा आज अत्यंत टाकावू बनला आहे.
आता आमचे हायस्कुलातले बेम्भाटे मास्तर नेहमीच सांगायचे की आपण कितीही निरर्थक असे लांबलचक काहीही लिहिले की त्याचा निष्कर्ष?त्या विश्लेषणातून उद्भवणारे प्रश्न हे मांडले  गेलेच पाहिजे.म्हणून थोडक्यात निष्कर्ष /प्रश्न असे-
१)प्रत्येक व्यक्तीला अन्न,वस्त्र,निवारा या प्राथमिक गरजा आहेत.देश वगैरे ही गोष्ट त्यानंतरची दुय्यम/तिय्यम प्रकारात मोडणारी आहे का?
२)येथिल बहुतांश लोकांना इतरांवर वर्चस्व गाजविणेची असलेली जुनी खरुज कोणत्याही औषधाने मिटणे शक्य नाही.कारण अशा प्रकारची खरुज ही अनुवंशिक असते असे कुणीतरी तज्ञ व्यक्तीने म्हटलेच आहे.तसे ते कुणीही म्हटले नसल्यास मीच इतक्यात म्हटले आहे,असे समजावे.
३)येथिल विविध अंतर्विरोध हे एका व्यक्तीव्यक्तीमधील संपर्कातील अडथळे /भिंती आहेत का?.या भिंती अनुवंशिक असल्यामुळे त्या जर्मनीच्या भिंतीप्रमाणे पाडून टाकणे शक्य नाही कारण त्या असूनही दिसत नाहीत?
४)तरीही भारत हा देश एकत्र इतकी वर्षे का राहिला,यात आश्चर्य म्हणजे काहीच नाही.ही केवळ निसर्गाची कृपा आहे.आणि तो पुढेही तसाच राहील,याचेही कारण तत्कालीन अपवादात्मक लोकांचे देशप्रेम आणि त्याचे भौगोलिकदृष्ट्या असणारे स्थान आहे.आणि एवढ्या मोठ्या देशाला पोसणे ही आजच्या काळात इतर कोणत्याही देशाला केवळ अशक्य अशीच गोष्ट आहे.हे म्हणजे कोट्यवधी पांढऱ्या हत्तींना पोसण्यासारखे आहे.
५)काही अपवादात्मक लोकांनी विखुरलेल्या साम्राज्याला एकत्र केले होते.त्यांना स्वातंत्र्यसैनिक असे म्हणतात.त्यांचे आजच्या भारताच्या असण्यात निसर्गाखालोखाल योगदान आहे.
६) काही तुमच्या - माझ्यासारखे बरेच अपवादात्मक लोक अजून शिल्लक आहेत,ज्यांना खरोखर देशाबद्दल खरोखर काही प्रेम आहे.पण आपण अगोदरच स्वतंत्र असल्यामुळे आपल्याला का म्हणून कोणी स्वातंत्र्यसैनिक म्हणेल? खरे म्हणजे स्वातंत्र्यात असूनही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागणे,यासारखे मोठे दु:ख संबंध पृथ्वीतलावर नाही.

No comments:

Post a Comment