Monday 19 November 2012

ह्याक, ह्याक

ह्याक, ह्याक !

by फेस बुके on Friday, October 19, 2012 at 2:49pm ·


जॉन एमब्रोस फ्लेमिंग एकदा मार्कोनीच्या वायरलेस टेलिग्राफसंदर्भात प्रयोग करून दाखवत होता. तो यशस्वी सुद्धा झाला. त्या प्रयोगाला महान जादुगार नेव्हिल मस्कलीन हजर होता. मस्कलीनला त्यात लैच त्रुटी असाव्यात असे वाटून गेले. पण त्या नेमक्या कोणत्या  हे त्याला समजेना. असे कुठे काही अडले की तत्सम तज्ञ लोक भारतात येत असत. मस्कलीन सुद्धा त्याला अपवाद कसा असणार ? तो पण अर्थातच आला. तर असाच प्रश्नाच्या उत्तरासाठी वणवण भटकून तो थकून गेला पण त्याला उत्तर मिळाले नाही. अशातच त्याला बैलगाडीवरून जाणारा एक शेतकरी दिसला. त्याने याला लिफ्ट दिली. खाणाखुणांनी दोघांचे बोलणे सुरु होते. कारण मस्कलीनला मराठी येईना आणि शेतकऱ्याला इंग्रजी !


दूरवर शेतात एक झोपडीवजा घर लागले तसा


" तुम्ही थांबा मी आलोच " असे खुणेनेच सांगून शेतकरी तिकडे गेला. तो बराच वेळ झाला येईचना. मस्कलीनने अनेक प्रकारे त्याला हाका मारून पाहिल्या पण उपयोग झाला नाही. आता काय करावे अशा विचारात त्याने बैलांना चाबूक मारून पाहिला पण ते सुद्धा जागचे हलेनात. शेतकरी एकदाचा आला त्याने सोबत बरेच खाद्यपदार्थ आणि फळे आणली होती. तो गाडीत बसला आणि त्याने ती मस्कलीन ला दिली.

त्यावर त्याने शेतकऱ्याचे आभार मानले आणि मग काय बस शेतकऱ्याने " ह्याक " आवाज करताच बैल धावू लागले ! मस्क्लीन सुद्धा आनंदाने 'ह्याक ह्याक' शब्द उच्चारून नाचू लागला. एकंदरीत "ह्याक" या शब्दाने त्याच्यावर जादूच केली. शेतकऱ्याला निरोप देताना सुद्धा लैच वेळा गहिवरून त्याने " ह्याक" शब्द निरोपादाखल उच्चारला !


नेव्हिल जादुगार असला तरी त्याने 'वायरलेस टेलिग्राफी' संदर्भात काही मुलभूत संशोधन केले होते. तो मार्कोनीचा टीकाकार आणि विरोधक मानला जात असे. मात्र त्याचा उद्देश फक्त मार्कोनीच्या वायरलेस टेलिग्राफितले दोष दाखवून देणे इतकाच होता. ह्याक शब्दाची जादूच अशी भारी की त्याने जॉन फ्लेमिंगचा प्रयोग चालू असताना ते वायरलेस मेसेजेस चक्क "ह्याक " केले आणि स्वतःचे मेसेजेस तिथे ब्रोड्कोस्ट केले. मार्कोनीच्या डिव्हायसेस मधील त्रुटी अर्थातच समोर आल्या आणि नंतर त्यात लैच वेळा सुधारणा झाल्या.

तर इतिहासातील पहिला ह्याकर नेव्हिल मस्कलीन ला लैच वेळा "ह्याक !"  :-)

मांजर आणि नेब्युलायझेशन

मांजर आणि नेब्युलायझेशन

by फेस बुके on Monday, November 5, 2012 at 6:57pm ·


तर ज्याचे काम त्याने करावे असे लैच महान लोक सांगून गेलेत, त्याची प्रचीती आज आली. आपल्याकडे एक मांजर आहे. पाळलेले नाही, पण रोज दोन पाच वेळेला येते. मुलांनी त्याला लैच लाडावून ठेवले आहे. म्हणजे ते मांजर बोर्नव्हीटा घातलेलेच दुध पिते, आणि त्याला ओरिओ बिस्कीटेच आवडतात. आपण घरी आलो म्हणजे ते पायात घोटाळत राहते. पायाने ढकलले की ते बोटांशी खेळत राहते. पायाचा अंगठा चाटत राहते. कधी आरामात बिछान्यावर आपल्या पायांशी झोपी जाते. मात्र आजपर्यंत चावले नव्हते. लैच निरुपद्रवी आहे, असा आपला समज होता.


काल आमच्या मोठ्या बच्चूने सांगितले

" पप्पा, माऊला तपासा !"

" कारे बेटा, काय झाले माऊला ?"

" तिला ना कफ झाला आहे !"

" काय सांगतोस , तुला कसे माहित ?"

" ती घुरघुर करते पप्पा !"
" अच्छा, ती आली की आपण तपासू हं बेटा !" त्याला काहीतरी सांगायचे म्हणून आपण म्हणालो. आणि दुपारी मस्त किरकोळ वामकुक्षी घेतली. मस्त गाढ झोपेत असताना पोरांनी उठवले.
" पपा , माऊ आली !"
" येउदेना बेटा मग ! जरा वेळ झोपू दे आपल्याला आणि तु पण झोप . तिला बिस्किटे दे पाहिजे तर !"
" तुम्ही तिला तपासा !"
" अरे बेटा, मांजराचे डॉक्टर्स वेगळे असतात. "
" नाही पण तिला तपासा !"

मांजराला तपासण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याच्या घशातून घुर्र्र आवाज येत होता. मांजर अशक्त वाटत  होते. पहिल्यांदा वाटले याचा घसा बसला असावा. म्हणजे फयारीन्जायटीस वगैरे .. पण नंतर लक्षात आले कि त्याची छाती जरा वेगाने धपापते आहे. तोंडाने श्वास घेत होते. "ख्याक " आवाज करून ते एकदा खोकले सुद्धा ! मग आपण त्याच्या छातीला स्टेथो लावला तर चक्क र्होंकाय ऐकू आल्या. आपण गोंधळून गेलो ! मांजराला पण थंड वातावरणामुळे, अलर्जेनस मुळे ,धुळीमुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा तत्सम फ्याकटर्समुळे स्पाझम होत असावा का ? पण मांजराला कसला आलाय स्ट्रेस ? :-) एकंदरीत आपण त्याला अलर्जीक ब्रोन्कायटीस असावा का, असा विचार करत असतानाच छोटा बच्चू म्हणाला -
" तिला काय झालं पापा ?"
" तिला थोडा कफ झाला आहे बेटा !"
" मग तिला नेबू द्याना पप्पा !"
" कोण नेबू ? "

" ते बघा नेबू !" त्याने नेब्युलाझरच्या मशिनकडे निर्देश केला.
" द्याना पप्पा !"
" द्याना पप्पा नेबू " दोन्ही पोरे हट्टालाच पेटली
" बेटा, अरे हे मशीन लहान मुलांसाठी आहे. मांजराला नाही चालत हे मशीन .त्यांचे मशीन वेगळे असते !"
पण मुले ऐकेचनात. शेवटी आपण म्हणालो " ठीक आहे आपण संध्याकाळी दुसरे मशीन आणू आणि त्याला वाफ देऊ. जा आता खेळायला !"
आपण संध्याकाळी क्लिनिकला आलो आणि सदर प्रकार विसरूनही गेलो. संध्याकाळी बायकोने फोन केला. " मुले काय म्हणताहेत ऐका !"
" हं, दे त्यांना !"
" पप्पा, पप्पा "
" हं, बेटा, बोल !"
" ते मशीन घेऊन या !"
" कशाचे मशीन ?"
" माऊला वाफ द्यायची आहे "
" बरे, बरे दुकान उघडे असले तर आणीन बेटा !"
" पप्पा नक्की आणा !"
" हो नक्की आणतो , मम्मीला दे फोन !"
" हलो "
" अगं , काय पोरांनी हट्ट लावला आहे? "
" अहो, मी काय करू पोरं ऐकतच नाहीत ! त्यांच्या समजुतीसाठी काहीतरी घेऊन या "
" त्यांना सांग पप्पा येताना खेळणी आणणार आहेत "
" माझे सांगून झालेहो , आता नाहीच ऐकत आहेत ती तर काय करू ?"
" अगं, पण मांजराला नेब्युलायझेशन कसे देणार ?"
" तुम्हीच बघा, मला त्यातले काय समजते ?आणा काहीतरी , बाय "
आता आपला अगदी नाईलाज झाला. मांजराला वाफ देण्याचे नाटक तरी करणे आवश्यक होऊन बसले होते. पण विनाकारण नेब्युलायझर ची चेंबर खराब करण्यात अर्थ वाटेना !
ओपीडी आटोपून आपण सर्जिकलचे दुकान गाठले
" नेब्युलायझरची चेंबर द्या "
" साहेब, नुसती चेंबर  काय नेता, मशीन बरेच जुने झाले असावे , नवीनच घेऊन जाना !"
" नवीन केवढ्याला ?"
" हे बघा हे साडेतीन , हे चार आणि हे दोन !"
" म्हणजे साडेतीनशे, चारशे, दोनशे ? आयला एवढे स्वस्त झालेत नेबुलायझर्स ?"
" शे नाही साहेब, हजार ! नुसती केबलच चारशे रुपयाला आहे."
" हं, आपल्याला वाटलेच. कारण खुद्द आपण पाच वर्षांपूर्वी ७ हजाराला घेतले होते. ते मेड इन जर्मनी आहे. हे चायनाचे दिसतेय "
एकंदरीत तो मनुष्य वैतागला आणि म्हणाला " साहेब , अहो तेव्हाची मशीन्स लै भारी होती. तुम्ही कशाला उगाच पैसे घालवता ? हि केबल घेऊन जा. फक्त ४०० रुपये !
 एड्ल्ट साठी पाहिजे कि पीडीयाट्रींक ?"
" मांजरासाठी " असे शब्द आपण ओठात आले होते,ते आपण  ओठातच थोपवले आणि ट्यूबींग, मास्क, चेंबर घेऊन तेथून निघालो.
घरी आल्यावर मुलांनी कुतूहलाने तो चेंबर वगैरे प्रकार पाहिला. आणि अत्यानंदाने ते मांजराची वाट पाहू लागले. पण मांजर काही आले नाही.

आपण सकाळी सकाळी नवीन चेंबर लावून मशीन सुव्यवस्थित चालते आहे याची चाचणी घेतली.
आज सकाळी मात्र ते आले.
" पप्पा आली माऊ !"
"पपा नेबू द्या तिला "
" अरे वा , आले का छान !"
आपला अर्थातच नाईलाज होता.
" ठीक आहे बेटा, आपण देऊ तिला वाफ !"
आपण अस्थ्यालीन आणि तत्सम औषधाचा डोस बनवून चेंबर मध्ये टाकला. आणि मांजराला एका हाताने पकडून ठेवले.
मांजराला तो एक नवीन खाद्यपदार्थ वाटला कि काय पण त्याने मास्क चांगला चाटून काढला. च्यायला हे मांजर वाफ देऊ देईल का नीट, शंका वाटायला लागली.
"पप्पा मी बटन सुरु करू ?"
" हं. कर बेटा, पण तुम्ही दोघे जरा दूर थांबा. मांजर घाबरून उडीबिडी मारेल अंगावर !"
मुलांनी बटन सुरु केले आणि मशीनचा सुर्र्र्रर्र्र्रर्र्र्र आवाज येऊ लागला.मांजर सुरुवातीला थोडे बिचकले पण नंतर येणाऱ्या वाफेकडे जिज्ञासेने बघू लागले
मांजराच्या तोंडाला मास्क बांधणे म्हणजे निव्वळ त्याच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे लैच वेळा होते. पण मांजर हा एकंदरीत गरीब प्राणी असल्याचा समज असल्याने एकदाचा मास्क त्याच्या गळ्यात अडकवला. त्याने आधी तो मास्क चांगला चाटून काढला. नंतर त्याची चळवळ सुरु झाली. एरवी लहान मुले वाफ घेताना करतात, तसेच हातवारे ते करू लागले. पण आपण त्याला घट्ट पकडून ठेवले होते. आता त्याची गुरगुर वाढली. आणि ते सुटण्यासाठी धडपड करू लागले. पण चारशे रुपये खर्च केला आहे, तर निदान त्याला पूर्ण वाफ द्यावी म्हणून आपण त्याला धीर देत राहिलो. आता मांजराची सहनशक्ती संपली आणि त्याने धडपडून स्वतःची सुटका करून घेतली. तो मास्क सुद्धा ओरबाडून काढून टाकला. आणि फिस्कारून खाली उडी मारली .पायाला काही टोचल्यासारखे जाणवले पण त्या गडबडीत आपण लक्ष दिले नाही.

" पप्पा नक्त .." छोटा बच्चू ओरडला .आपण पहिले तर आपल्या पायावर रक्ताची एक लालभडक रेष उमटलेली. थोडक्यात मांजराने आपल्याला चावा घेतला होता.
" सॉरी हो, मीच मुलांच्या हट्टाला बळी पडले. थांबा मी ब्यांडेज आणते" बायको म्हणाली.
" अगं प्राणी चावल्यावर ब्यांडेज शक्यतो बांधत नाहीत. "
" पण तुम्ही लावा काहीतरी पायाला." ती रडवेल्या आवाजात म्हणाली
आपण मांजराला  "रिल्याक्स ,रिल्याक्स" असे म्हणून  पुन्हा जवळ घेतले आणि त्याला थोपटले. त्यानंतर ते थोडे शांत झाले आणि आपल्या पायाशी खेळून माफी मागू लागले. त्यातच त्याने चावा घेतलेला भाग चाटून काढला. आता हे म्हणजे आणखीच वाईट प्रकार होता. पण त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला काय कळते ? आपण आपला पाय साबणाने धुवून काढला.
नंतर मोठ्या बच्चूने मांजराला "हाड हाड " करून हाकलून दिले.
आणि मांजरही त्याच्या आज्ञेचे पालन करीत निघून गेले. संध्याकाळी मांजर नेहमीप्रमाणे आले तर मस्त ठणठणीत वाटले. एकंदरीत वाफाऱ्याचा उपयोग झाला असावा की काय कळेना!
आता आपण एन्टी ऱ्याबीज व्ह्याकसीन घ्यावे की नाही, असा विचार करत आहोत.
टीप : कुणाला त्यांच्या मांजरास नेबुलायझेशन द्यावयाचे असल्यास कृपया पत्ता कळवावा. स्वखर्चाने नेबुलायझेशन चेंबर, ट्यूबिंग आणि मास्क मोफत पाठवू. अर्थातच धन्यवाद ! :-)