Wednesday 14 September 2011

ईद मुबारक

संस्कृती ही भौगोलिक सीमारेषांनी मर्यादीत करता येत नाही.कालान्वाये बदल अपरिहार्य असतात.आज भारत-पकिस्तान वेगळे झाले नसते,तर एक अखंड देश राहिला असता.. तर आपण कदाचित आजच्या पाकिस्तानच्या त्या टोकावर वस्ती करून राहिलो असतोच.आपल्या संविधानाने सर्वधर्मसमभाव तत्व अंगिकारले आहे.त्यामुळे संविधानाला अनुसरण करणे आणि या देशातील सर्व लोक भारतीय नागरिकांच्या धर्म,भाषा,इत्यादी विविधतांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे.जेव्हा आपण इतर धर्मियांचे सण आपल्या धर्माप्रमाणे साजरे करू तेव्हाच कदाचित आपण खऱ्या अर्थाने भारतीय होऊ! ईद मुबारक!!!

Tuesday 13 September 2011

आपले देशप्रेम आणि भौगोलिक परिस्थिती


by फेस बुके on Saturday, August 6, 2011 at 6:23pm
आता मी काही कुणी राजकीय विश्लेषक नाही,हे आपणांस माहित आहेच.भारतवर्ष/हिंदुस्थान ही अर्थातच एक अर्थातच एक भौगोलिकदृष्ट्या समजून घेण्याची गोष्ट आहे.पूर्वीही अनेक छोटी मोठी राज्ये भांडत होतीच.मला तर वाटते भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र असल्यामुळे आणि एका बाजूला हिमालयासारखे मोठे डोंगर असल्यामुळे भारतीय लोकांना स्थलांतरित होणे फारसे जमले नसावे.कारण पूर्वीच्या काळी दळणवळणाची सोय होतीच कुठे? आता एखाददुसरा कोणी एवढा मोठा सागर किंवा हे विशाल पर्वत लांघून गेला असेल,तर तो तिकडेच अडकून पडला असण्याची शक्यता आहे.कारण वास्को द गामा किंवा हिंदुस्थानला येण्याच्या नादात चुकून अमेरिकेला जाऊन पोचलेला कोलंबस (चू.भू.देणे घेणे इतिहासात फारशी गती आपल्याला कधीच नव्हती)किंवा इतर तत्सम मनुष्याची जशी दखल इतिहासाने घेतली तशी ती त्या तत्सम हिंदुस्थानी मनुष्याचीही अर्थातच घेतली असती.आणि जे लोक हिमालयात गेले,ते म्हणजे एकतर या संसारातून मुक्त झाले,किंवा फार तर गिर्यारोहक झाले असावेत.थोडक्यात म्हणजे प्रचंड अंतर्विरोधांनी भरलेला हा देश परकीय आक्रमणाला अर्थातच बळी पडत गेला.कारण इथे सारेच एकमेकांचे शत्रू होते.म्हणून स्वप्रदेशातील लोकांशी गद्दारी करून यांनी आपल्याच राजे लोकांवर आक्रमण करून परकीयांचे मांडलिकत्व पत्करण्यात धन्यता मानली.या ठिकाणी अगदी निर्विवादपणे आपण म्हणू शकतो,की हिंदुस्थान हा भौगोलिकदृष्ट्या नैसर्गीक सीमारेषांमुळे बांधला गेलेला आणि अनेक छोट्या प्रदेशांचा मिळून बनलेला एक मोठा समूह होता,जो आज सुध्दा अर्थातच आहे.येथिल लोकांमध्ये आपसात फार प्रेम,बंधुभाव होता असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरावे! आज भारत किंवा हिंदुस्थान हा पूर्वी जसा होता तसाच तो आजही असंख्य अंतर्विरोधांनी भरलेला आहे.आणि हे विविध सीमावाद,भाषावाद,जाती,जमाती
,धर्म,पंथ वर्णभेद आपली राज्यघटना मोडून काढू शकली नाही.कारण स्पष्ट आहे-इथल्या बहुतांश लोकांना देशप्रेम कशाशी खातात,हे माहित नाही.कारण,ते अशिक्षित, अज्ञानी आहेत आणि त्यांना फक्त दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे.आणि जे सुस्थितीत आहेत,त्यांनी देशात विविध धर्माच्या आणि भेदाभेदांच्या नावावर स्वतःचे वर्चस्व सिध्द करण्याचा सपाटा चालवला आहे.कारण पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने मिळालेले वर्चस्व एक राज्यघटना काय खोडू शकेल अशा समजात ते वावरत असून घटना बदलण्याच्या गोष्टी अधूनमधून बोलत असतात.आणि यात सर्वात धूर्त एक वर्ग आहे पुढाऱ्यांचा-त्यांना तर ही  इतर दोन वर्गांची आजची जीवनपद्धती त्यांच्या पथ्यावर पडणारीच आहे ! आता धर्माकडे क्षणभर वळू कारण तो संवेदनशील मुद्दा आहे.तर एखाद दुसरा अपवाद वगळता भारतातील धर्मांनी आपल्याच धर्मातील लोकांचेही चांगले पाहिले नाही.म्हणून धर्म ही संकल्पना आज आज एका विचित्र अवस्थेला येऊन पोचली  आहे.त्यामुळे कोणताही धार्मिक मुद्दा आज अत्यंत टाकावू बनला आहे.
आता आमचे हायस्कुलातले बेम्भाटे मास्तर नेहमीच सांगायचे की आपण कितीही निरर्थक असे लांबलचक काहीही लिहिले की त्याचा निष्कर्ष?त्या विश्लेषणातून उद्भवणारे प्रश्न हे मांडले  गेलेच पाहिजे.म्हणून थोडक्यात निष्कर्ष /प्रश्न असे-
१)प्रत्येक व्यक्तीला अन्न,वस्त्र,निवारा या प्राथमिक गरजा आहेत.देश वगैरे ही गोष्ट त्यानंतरची दुय्यम/तिय्यम प्रकारात मोडणारी आहे का?
२)येथिल बहुतांश लोकांना इतरांवर वर्चस्व गाजविणेची असलेली जुनी खरुज कोणत्याही औषधाने मिटणे शक्य नाही.कारण अशा प्रकारची खरुज ही अनुवंशिक असते असे कुणीतरी तज्ञ व्यक्तीने म्हटलेच आहे.तसे ते कुणीही म्हटले नसल्यास मीच इतक्यात म्हटले आहे,असे समजावे.
३)येथिल विविध अंतर्विरोध हे एका व्यक्तीव्यक्तीमधील संपर्कातील अडथळे /भिंती आहेत का?.या भिंती अनुवंशिक असल्यामुळे त्या जर्मनीच्या भिंतीप्रमाणे पाडून टाकणे शक्य नाही कारण त्या असूनही दिसत नाहीत?
४)तरीही भारत हा देश एकत्र इतकी वर्षे का राहिला,यात आश्चर्य म्हणजे काहीच नाही.ही केवळ निसर्गाची कृपा आहे.आणि तो पुढेही तसाच राहील,याचेही कारण तत्कालीन अपवादात्मक लोकांचे देशप्रेम आणि त्याचे भौगोलिकदृष्ट्या असणारे स्थान आहे.आणि एवढ्या मोठ्या देशाला पोसणे ही आजच्या काळात इतर कोणत्याही देशाला केवळ अशक्य अशीच गोष्ट आहे.हे म्हणजे कोट्यवधी पांढऱ्या हत्तींना पोसण्यासारखे आहे.
५)काही अपवादात्मक लोकांनी विखुरलेल्या साम्राज्याला एकत्र केले होते.त्यांना स्वातंत्र्यसैनिक असे म्हणतात.त्यांचे आजच्या भारताच्या असण्यात निसर्गाखालोखाल योगदान आहे.
६) काही तुमच्या - माझ्यासारखे बरेच अपवादात्मक लोक अजून शिल्लक आहेत,ज्यांना खरोखर देशाबद्दल खरोखर काही प्रेम आहे.पण आपण अगोदरच स्वतंत्र असल्यामुळे आपल्याला का म्हणून कोणी स्वातंत्र्यसैनिक म्हणेल? खरे म्हणजे स्वातंत्र्यात असूनही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागणे,यासारखे मोठे दु:ख संबंध पृथ्वीतलावर नाही.

अध्यात्मिक गुरु लोकांना राजदुताचा दर्जा देण्यात यावा !


by फेस बुके on Monday, August 22, 2011 at 12:55pm
तर सरकार,राजकारण आणि अध्यात्मिक गुरु यांच्या नादी लागू नये,असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे म्हणून आम्ही पूर्वीपासूनच या गोष्टी टाळत आलो.कारण हे विषय किचकट असून एकमेकांशी इंटरनेट किंवा  इंट्रानेट( शबुद बरुबर हाये का?) ने जोडलेले असतात,असेही बिल गेट्स किंवा बिल क्लिंटन नामक तत्वज्ञ व्यक्तीने म्हटल्याचे आपणास् माहित असेलच.त्याचा प्रत्यय आपल्याला काल आला.नव्हे काल खात्रीच झाली,की अध्यात्म हा राजकारणी लोकांचा विषय आहे.आता सरकार हे एक अत्यंत किचकट आणि चिवट यंत्र असते,हे आपणास माहित आहेच.अनेक लहान लहान किंवा छोट्या मोठ्या असंख्य स्पेअर पार्टस्‌नी मिळून बनलेले असते.हे पार्टस म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या 'खुर्च्या'असून त्यावर मानवसदृश्य ढेरपोटे लोक बसलेले असतात.ह्यांचे काम पूर्वी लोकांची सेवा करायची असे होते,असे म्हटले जाते.पण अलीकडे म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच पैसे खाण्याचे काम आवडू लागल्याने ते तेवढेच काम अत्यंत इमानेइतबारे करीत आहेत.कारण काम कोणतेही असो,ते आनंदाने करावे असे आमचे बेम्भाटे मास्तर जीव तोडून शिकवायचे.पण तिकडे लक्ष न दिल्यामुळे आम्ही मागे राहिलो,आणि म्हणून शेवटी इथे आलो.कारण इथे रिकामटेकडे बुद्धीवादी लोक काहीनाबाही चर्चा भांडणे इत्यादी गोष्टी करत असल्याचे समजते.तर ते असो.     

 आता सरकार म्हटले की ते एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते.त्यात अनेक हार्डवेअर,सोफ्टवेअर आणि अप्लीकेशनस् असणारच.आणि ओघानेच त्यात जंक फाईल्स नावाचा कचरा जमा होतो,असेही आपण ऐकून आहोतच.आणि काही सॉफ्टवेअरस् अप्लिकेशनस्,इंकोन्पिटीबल होणे,हार्ड ड्राईव्ह फेल्युअर हे प्रॉब्लेम्स येतातच.हे प्रॉब्लेम्स भ्रष्टाचार,वाचाळपणा,दंडुकेशाही आदी व्हायरसच्या उद्भवामुळे होतात.अलीकडे या यंत्रणेतील सिब्बल आणि इतर दोन-तीन नावाचे हार्ड सोफ्टवेअर(आता हा काय प्रकार,ते आम्हाला अर्थातच कसे माहित असणार?)व्हायरसप्रमाणे काम करू लागल्याने सिस्टीम अर्थातच फेकून द्यावी की काय अशा निष्कर्षाप्रत जनता नामक लोक आले.(कारण जनता नावाचे जे लोक असतात,त्यांच्यासाठीच मुळात सरकार नावाची सिस्टीम अस्तित्वात आल्याचे आम्ही कधीतरी म्हटलेच आहे).तत्पूर्वी दुरुस्तीचा एक मोठा प्रयत्न करून पहावा यासाठी त्यांनी अण्णा या महान इंजिनिअरला  या सिस्टीमच्या दुरुस्तीसाठी बोलावून आणले. कारण हा मनुष्य आणि त्याचे लाखो करोडो शिष्य कैक वर्षांपासून सिस्टीमला दुरुस्त करून शिस्त लावण्याचे काम फुकटात करीत आहेत.या माणसाने आजपर्यंत अनेकदा सिस्टीमला दुरुस्त केले आहे.आता हे थोडे विषयाला धरूनच बरेच विषयांतर झाले ,त्याला आमचा नाईलाज आहे.    तर अण्णाजींनी आपले सत्याग्रह नावाचे टूलकीट सोबत आणले(ह्याच्याने सर्व निखळलेले स्क्रू फिट केले जातात असे म्हणतात.)आता सारी यंत्रणाच खिळखिळी झाल्याने लाखो,करोडो जनता नामक लोकांची आवश्यकता असल्याने आणि शेवटी हे जनतेचेच काम असल्याने जनताही स्वयंस्फूर्तीने या कामात अण्णांच्या पाठीशी उभी राहिली आहे.  

  एकंदरीत आता मूळ विषयाकडे वळू का? ठीक आहे.तर अण्णांनी आपल्या कार्यास एका उपोषणस्थळावरून सुरुवात केली कारण अण्णांची ही कार्यपद्धती गांधी आणि जेपी या अत्यंत महान इंजिनिअर लोकांसारखीच सत्याग्रह नामक तंत्रावर आधारलेली आहे.पण सरकार ही यंत्रणा स्वतः च"मी नादुरुस्त नाही,मी अजिबात नादुरुस्त नाही"असे स्वतःच सांगू लागल्याने अण्णांनी सोबत "जनलोकपाल"  टीम व्युअर,रजिस्ट्री बुस्टर,जंकफाईल क्लीनर वगैरे सोफ्टवेअरस् आणली असून रिमोट स्थळावरून अण्णांचे काम जोरात चालू आहे.आता सिस्टीमचे प्रमुख जे एम.एम.एस.(MMS) हे अत्यंत मनमोहक व्यक्तिमत्व असून ते "मौनीबाबा"( इथे मला कुसुमाग्रजांच्या "अनंताचे मौनीबाबा हसले थोडे अंधारात!" अशा गूढ ओळींची आठवण झाली.आहेत) कारण ते क्वचीतच बोलतात.यांना बोलणे फारच जड वाटत असल्याने त्यांनी आपल्या वतीने बोलण्यासाठी सिब्बल आणि इतर दोन तीन सोफ्ट-हार्डवेअरस् ची नियुक्ती केल्याने गाडे आणखीच फसत गेले.हे फसलेले गाडे काढण्याची प्रक्रिया साधारणतः अशी:
 १)अण्णांनी उपोषण नामक तंत्राचा यशस्वी अवलंब केल्याने सरकारची पाचावर धारण बसते,
२)नंतर ते चर्चेला लोक पाठवते,अशा अनेक बैठका होऊन मग
 ३)सिस्टीममध्ये काय बदल करावेत म्हणजे आम्ही(म्हणजे सरकार) दुरुस्त होऊ अशी विचारणा करते,
 ४)मग स्वतःत सुधारणा करते.

पण यावेळेला सरकारने  आधीच वाचाळपणा केल्याने सरकारला तोंड दाखवायला जागा अशी उरली नाहीच म्हणून 'आम्ही नाही जा!' असा बालीश हट्ट सरकार धरून बसले होते.आणि आता थोडे ठिकाणावर येऊ घातले असून सरकारने चर्चेसाठी अध्यात्मिक गुरूंना बोलावले आहे.आता अध्यात्माचा आणि राजकारणाचा आणखी आंदोलनाचा नेमका काय संबंध असतो,हे आपल्याला कधीच कळले नव्हते;पण मागे रामदेवबाबा नामक प्रकरणात रवीशंकर नामक महाराज यांनी मध्यस्ती केल्याचे ऐकिवात आहे.आणि हेच बाबा अलीकडे उपोषणस्थळीही आढळून येत आहेत.याशिवाय भैय्या नामक आणखी एक गुरु संदेशवहन करण्यासाठी नेमण्यात आल्याचे समजते कारण दुरुस्तीसाठी चर्चा आणि संदेशवहन या गोष्टी प्रकृतीच्या विचारपुशीच्या नावावर सर्रास हे लोक साधून घेतात म्हणून यांना सामान्यतः"साधु" असे म्हटले जाते.या सर्वांची  डाळ न शिजल्यास मदतीला "सारंगी"नामक जुनेच सोफ्टवेअर अपडेट करून सरकारने स्वतःत इन्स्टाल केल्याचे समजते. सारंगी हे सोफ्ट पद्धतीचे अत्यंत हार्ड सोफ्टवेअर असल्याचे समजते.हे सोफ्टवेअर दोन्ही बाजूने म्हणजे इंजिनीअरच्या आणि सिस्टीमच्या बाजूने वंगणाची कामे करतात.म्हणजे हे असे अवघड प्रकार असतात, कारण ते आपल्या समजण्यापलीकडचे असतात.मात्र या वेळेला सरकार दुरुस्त होतंय की फेकून द्यावं लागतं,हे आता लवकरच समजेल.सरकार तरले तर यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या अध्यात्मिक गुरूंना सरकारने देशांतर्गत राजदूताचा दर्जा देऊन त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यास काय हरकत आहे? अर्थातच धन्यवाद! जय भारत!(टीप: लेखक हे आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय राजकारणाचे,अध्यात्माचे,बुवाबाजीचे,अजिबात विश्लेषक नाहीत.
(c) All Rights Reserved! हे लिखाण फक्त आणि फक्त लेखकाच्या नावावरच शेअर करण्यास परवानगी आहे.कृपया स्वतःच्या नावावर खपवू नये.)

स्वातंत्र्य आणि आपण


by फेस बुके on Tuesday, July 26, 2011 at 10:18am
        आपला भारत असो वा इतर कोणताही देश,सामान्य मनुष्याचा जन्मच मुळी पारतंत्र्य सोसण्यासाठी असतो,असे कुणीतरी( किंवा आता एवढ्यात आपणच  म्हटले आहे.बऱ्याच महान कवींनी उदा.नामदेव ढसाळ -स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्या कवितेत अत्यंत वाईट( जीवनाचे नाव"फुल्याफुल्या" ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं...) शब्दाने केला आहे, असेही काही समीक्षक सांगतात.
ढसाळांच्या विद्रोहाचा भाग सोडल्यास स्वातंत्र्याची मीमांसा करायची झाल्यास ती अर्थातच आपल्या म्हणजे माझ्या आवाक्याबाहेरची आहे.तरीही प्रयत्न करून पाहतो.त्याचे असे आहे की तथाकथित स्वातंत्र्य हे विभिन्न जाती,जमाती,विचार,संस्कृतीच्या लोकांना दिले गेले.उदा.हिंदुस्थान हा हजारो वर्षांपासून असंख्य जमातींचे लटांबर सांभाळून आजवर प्रवास करत आला आहे.तर हे असे विविध  चित्रविचित्र विचारसरणीचे लोक एकत्र कसे राहू शकतील,यावर क्रमाक्रमाने विचार सुरु झाला आणि राज्यघटना अस्तित्वात आली. हे अर्थातच ज्या कोण्या देशात प्रथम राज्यघटना आली,तेथे म्हणजे ब्रिटन/अमेरिका वगैरे देशांत प्रथम घडले असावे,हे ओघानेच आले.कारण भारतात सर्व गोष्टी यांच्यापेक्षा उशीरानेच भारतात येतात,हे आपणा सर्वांना ज्ञात असेलच.आता कोणताही कायदा/नियम म्हटला म्हणजे बंधन आलेच! त्यामुळे ते काही विशेष जमातीचे लोक सोडल्यास सर्वांना सारखे लागू होतात,असे जाणकार सांगतात.आता ह्या विशिष्ट जमातींमध्ये- मंत्री,खासदार,आमदार,उद्योगपती,वा यासारख्या अशाच काही प्रबल जमातींचा समावेश होतो.कारण हे लोक इतर लोकांना स्वातंत्र्यात जगण्यासाठी अधुनमधून काहीबाही योजना तरतुदी कायदे राबवीत असतात,असे ऐकिवात आहे.
        खरे म्हणजे हे लोकच खऱ्या अर्थाने मनमुरादपणे स्वतंत्र असतात. आता ज्याचे हाती कारभार,तोच सरकार! अशी म्हण आपण ऐकून असालच.आणि सरकारपुढे शहाणपण चालत नाही.थोडक्यात म्हणजे सरकार ही अत्यंत किचकट यंत्रणा असल्यामुळे ती नेहमीच बिघडलेली दिसते.हे तर नमनालाच घडीभर तेल झाले,क्षमस्व..तर त्याचे थोडक्यात असे आहे की केवळ चार जणांच्या एका कुटुंबाचे उदाहरण घेतले तरी त्या कुटुंबातील ते चार जण तरी स्वतंत्र असतात का? म्हणजे नवरा बायकोवर हुकुमत गाजवतो/किंवा याच्या उलटही घडते.कधी मुले आईबापाला छळतात.इथे कुणाचा कायदा चालतो/कोण स्वतंत्र असते,हे ठरवणे भयंकर कठीण असते.
आता याच्याही पुढे जाऊन सांगतो- समजा एकटा श्रीमंत मनुष्य आहे.साऱ्या सोयीसुविधांचा सुकाळ आहे.त्याला कोणतेच बंधन नाही- मग असा मनुष्य तरी स्वातंत्र्य उपभोगत असेल,असे वाटणे साहजीकच आहे.पण ते खरे नाही.तो स्वतःचाच अनेक बऱ्यावाईट सवयींचा 'गुलाम' असतोच.आपापल्या इच्छेप्रमाणे जगणे,ही सुध्दा एक मानसिक गुलामगिरीच! अशी अपवादात्मक उदा.सोडल्यास ,कोण आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगू देईल असे वाटते?
खरे स्वातंत्र्य हा प्रकार फक्त म्हणण्यासाठी ठीक आहे.पण तो तसा कधीही असणे शक्य नसते.
स्वातंत्र्य म्हणजे काही बारीकसारीक हक्कांच्या बदल्यात म्हणजे ( उदा.जगण्याचा हक्क,भारतात कुठेही फिरण्याचा/वस्ती करण्याचा हक्क इत्यादी ) लादून घेतलेली/जन्मत:च  लादली गेलेली गुलामी असते!