Tuesday 13 September 2011

स्वातंत्र्य आणि आपण


by फेस बुके on Tuesday, July 26, 2011 at 10:18am
        आपला भारत असो वा इतर कोणताही देश,सामान्य मनुष्याचा जन्मच मुळी पारतंत्र्य सोसण्यासाठी असतो,असे कुणीतरी( किंवा आता एवढ्यात आपणच  म्हटले आहे.बऱ्याच महान कवींनी उदा.नामदेव ढसाळ -स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्या कवितेत अत्यंत वाईट( जीवनाचे नाव"फुल्याफुल्या" ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं...) शब्दाने केला आहे, असेही काही समीक्षक सांगतात.
ढसाळांच्या विद्रोहाचा भाग सोडल्यास स्वातंत्र्याची मीमांसा करायची झाल्यास ती अर्थातच आपल्या म्हणजे माझ्या आवाक्याबाहेरची आहे.तरीही प्रयत्न करून पाहतो.त्याचे असे आहे की तथाकथित स्वातंत्र्य हे विभिन्न जाती,जमाती,विचार,संस्कृतीच्या लोकांना दिले गेले.उदा.हिंदुस्थान हा हजारो वर्षांपासून असंख्य जमातींचे लटांबर सांभाळून आजवर प्रवास करत आला आहे.तर हे असे विविध  चित्रविचित्र विचारसरणीचे लोक एकत्र कसे राहू शकतील,यावर क्रमाक्रमाने विचार सुरु झाला आणि राज्यघटना अस्तित्वात आली. हे अर्थातच ज्या कोण्या देशात प्रथम राज्यघटना आली,तेथे म्हणजे ब्रिटन/अमेरिका वगैरे देशांत प्रथम घडले असावे,हे ओघानेच आले.कारण भारतात सर्व गोष्टी यांच्यापेक्षा उशीरानेच भारतात येतात,हे आपणा सर्वांना ज्ञात असेलच.आता कोणताही कायदा/नियम म्हटला म्हणजे बंधन आलेच! त्यामुळे ते काही विशेष जमातीचे लोक सोडल्यास सर्वांना सारखे लागू होतात,असे जाणकार सांगतात.आता ह्या विशिष्ट जमातींमध्ये- मंत्री,खासदार,आमदार,उद्योगपती,वा यासारख्या अशाच काही प्रबल जमातींचा समावेश होतो.कारण हे लोक इतर लोकांना स्वातंत्र्यात जगण्यासाठी अधुनमधून काहीबाही योजना तरतुदी कायदे राबवीत असतात,असे ऐकिवात आहे.
        खरे म्हणजे हे लोकच खऱ्या अर्थाने मनमुरादपणे स्वतंत्र असतात. आता ज्याचे हाती कारभार,तोच सरकार! अशी म्हण आपण ऐकून असालच.आणि सरकारपुढे शहाणपण चालत नाही.थोडक्यात म्हणजे सरकार ही अत्यंत किचकट यंत्रणा असल्यामुळे ती नेहमीच बिघडलेली दिसते.हे तर नमनालाच घडीभर तेल झाले,क्षमस्व..तर त्याचे थोडक्यात असे आहे की केवळ चार जणांच्या एका कुटुंबाचे उदाहरण घेतले तरी त्या कुटुंबातील ते चार जण तरी स्वतंत्र असतात का? म्हणजे नवरा बायकोवर हुकुमत गाजवतो/किंवा याच्या उलटही घडते.कधी मुले आईबापाला छळतात.इथे कुणाचा कायदा चालतो/कोण स्वतंत्र असते,हे ठरवणे भयंकर कठीण असते.
आता याच्याही पुढे जाऊन सांगतो- समजा एकटा श्रीमंत मनुष्य आहे.साऱ्या सोयीसुविधांचा सुकाळ आहे.त्याला कोणतेच बंधन नाही- मग असा मनुष्य तरी स्वातंत्र्य उपभोगत असेल,असे वाटणे साहजीकच आहे.पण ते खरे नाही.तो स्वतःचाच अनेक बऱ्यावाईट सवयींचा 'गुलाम' असतोच.आपापल्या इच्छेप्रमाणे जगणे,ही सुध्दा एक मानसिक गुलामगिरीच! अशी अपवादात्मक उदा.सोडल्यास ,कोण आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगू देईल असे वाटते?
खरे स्वातंत्र्य हा प्रकार फक्त म्हणण्यासाठी ठीक आहे.पण तो तसा कधीही असणे शक्य नसते.
स्वातंत्र्य म्हणजे काही बारीकसारीक हक्कांच्या बदल्यात म्हणजे ( उदा.जगण्याचा हक्क,भारतात कुठेही फिरण्याचा/वस्ती करण्याचा हक्क इत्यादी ) लादून घेतलेली/जन्मत:च  लादली गेलेली गुलामी असते!

No comments:

Post a Comment