Monday 14 May 2012

नागझिरा : एक सफर

           तर मनुष्याने नेहमी देशाटन करावे म्हणजे तत्सम विद्वान लोक भेटतात, तुम्हाला ज्ञान, मानसन्मान आणि इत्यादी गोष्टी प्राप्त होतात, असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे . आपण तसे लहानपणापासून उपद्व्यापी आहोत. लैच ठिकाणी भटकलो. अचानक कुठेही जाऊन टपकणे आपल्याला आवडते, मग ते जंगल का असेना ! एकंदरीत मित्रांनी आग्रह केल्यामुळे आपण या पूर्वनियोजित पण आपल्यासाठी अचानक अशा नागझिरा नावाच्या सफरीस होकार दिला. कारण ऐनवेळी त्या मित्रांच्यामधील एक जण 'अर्थभयास्तव' गायब झाला होता. आपल्याला वाघ नामक प्राण्याबद्दल लहानपणापासून कुतूहल आहे. सर्कशीत आणि प्राणीसंग्रहालयात आपण लैच वेळा वाघ, सिंह आणि इतर प्राणी बघितले होते.नाशिकच्या ब्रह्मगिरीची वारी आपण ५० वेळा केली असेल, पण माकडासारखा प्राणी सोडल्यास कुत्रा सुद्धा बघायला मिळाला नव्हता. एकदा भिमाशंकरच्या जंगलात दोन दिवस पायी भटकलो तर तिथेही निराशा झाली. जंगलातील खराखुरा पट्टेदार वाघ बघण्याची तीव्र इच्छा सतत राहिलेली होती; म्हणून आपण मान ना मान मै तेरा मेहमान असा विचार न करता तत्काळ होकार दिला आणि सर्वांचे तत्काल कोटयातून गोंदियाचे रिझर्वेशन केले. आमच्या पक्षीमित्र मित्राने सांगीतले की त्याचे तेथिल फॉरेस्ट ऑफिसर नामक इसमाशी बोलणे झाले असून आमच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय गोंदियापासून नागझिरा येथे जाण्यास्तव एक जिप्सी तयार ठेवण्यात आल्याचे समजले. आता हे म्हणजे लैच भारी झाले, असा विचार करून आपण त्या पक्षीमित्र मित्राचे लैच वेळा आभार मानले. आणि त्यानेही आपण त्याचेसोबत येत असल्याने आपले आभार मानले.

सहाशे किलोमीटर अंतर पार करून गोंदिया आले तेव्हा आपण गाढ झोपेत होतो. आपण आपल्या पक्षीमित्र आणि इतर चार मित्रांसोबत प्ल्याटफॉर्मवरून जात असता वाघ सिंह,हरीण,वानरे आणि इतर सर्व प्राणी  एक साथ आमच्यासोबत दादऱ्यावरून जात आहोत, हे पाहून आपण अचंबित झालो. कारण त्यात मनुष्यप्राणी असे आम्ही सहा लोक फक्त होतो. अर्थात आपण स्वतः , एक पक्षीमित्र आणि इतर चार मित्र ! (त्यांची नावे विस्तारभयास्तव देणे टाळत आहे.)


"ए चायss ए चाय चाय चाय ए ssss " "फेस बुके, गोंदिया आले, उठा!"
अशा अनुक्रमे चायवाला आणि पंचमित्र यांच्या आवाजाने जाग आल्यावर सदरील प्रकार हा निव्वळ स्वप्न असल्याचे लक्षात आले. मग ताजेतवाने होऊन चहा नामक गरम पाणी प्राशन केले.हा चहा आपण आजवर घेतलेला सर्वात बंडल चहा होता.एकंदरीत तर ते लैच वेळा असो.

गोंदिया स्टेशन मात्र दिसायला छान आहे. मात्र आपण अमुक एका दिशेस जायला हवे,असे अंदाजे बरोबर सांगीतले आणि मित्रांनी  तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे . ईस्ट वेस्ट प्रकाराचा गोंधळ झाल्यामुळे बराच मोठा फेरा पडून विरुध्द दिशेस पुन्हा मार्गक्रमण करीत आलो. स्टेशनबाहेर दूरदूर तक हॉटेल दिसले नाही, म्हणून विचारत विचारत सुमारे एक किलोमीटर अंतरावरील एका फेमस टपरीवजा हॉटेलात डाळवडे खाल्ले आणि चहा घेतला.इथला चहा खरोखरच छान होता; खोटे कशास बोला! यानंतर पक्षीमित्राने तत्सम गाडीवानास फोन लावला. त्याने आपण केव्हाचेच निघालो असून पोचतोच आहोत असे सांगीतले. या सत्वर सेवेची तारिफ करत आम्ही अडीच तास घालवले आणि शेवटी त्याला शिव्या घालण्याच्या विचाराशी येईपर्यंत तो मनुष्य हजर झाला आणि आपल्या हातून होणारे शाब्दिक पातक टळले. त्याने आणलेल्या ओम्नी नामक यंत्रात बसलो आणि मंगेसरी येथे पोचलो.तेथे पूर्वीच ठरल्याप्रमाणे आम्हाला एक मोठी राहुटी (टेन्ट) देण्यात आली .आत एअर कुलर वगैरे, लाईट, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था पाहून "पैसे वसूल" असा आनंद झाला.आली.गेल्यागेल्या आंघोळ आटोपून थोड्या गप्पा झाल्यावर जेवणाची ऑर्डर दिली. जेवण साधेच पण मस्त होते. लैच बरे वाटले.

दुपारी दोनेक तास झोप काढून झाल्यावर नवेगाव बांधला निघालो. रस्त्यात अनेक ठिकाणी हजारो झाडांचे ओंडके कापून ठेवण्यात आले होते. जंगलात अनेक झाडांच्या मुळाशी राख आढळून आली. एक दोन ठिकाणी आग पेटवली गेली होती. हा प्रकार तेंदुपत्ता जाळण्यासाठी केला जात असल्याचे समजले.हा नेमका काय प्रकार होता, ते समजू शकले नाही.संबंधितांनी तेथे जाऊन निरिक्षण करावे आणि नोंद घ्यावी.शिवाय अनेक झाडांची मुळे उघडी पडलेली होती. काही ठिकाणी मुळे खोदल्यासारखी वाटत होती. सदर मुळांच्या ठिकाणी थोडी माती आणून टाकल्यास ती झाडे जगू शकतात का? याचाही संबंधित लोकांनी लैच वेळा विचार करावा. नवेगाव बांध येथे न्याशनल वन्यजीव पार्क असून त्याची लैच दुर्दशा झालेली आढळली.

नवेगाव येथिल तलाव म्हणजे लैच भारी आहे. एकदम आवडला. . इथे पूर्वी सारस पक्षी असायचे असे ऐकले. मात्र आता एकही दिसला नाही. बगळे आणि पाणकोंबड्या दिसल्या.मासेमारी करणारे एक दोन आदिवासी सोडल्यास फार काही लोक दिसले नाहीत. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक जोडपी हातात हात गुंफून तलावावर मुक्त संचार करताना आढळून आली. असा आनंद घ्यायला आपल्याला सुद्धा लैच वेळा आवडला असता. एकंदरीत ते अशक्य असल्याने आपण आपला मोर्चा "नवेगाव न्याशनल  पार्क" कडे वळवला. इथे लैच प्राणी बघायला मिळतील असे वाटले होते, पण फक्त एक झोपाळू बिबट्या आणि एक अशक्त हरीण बघायला मिळाले. पार्कात सर्वत्र अस्वच्छता होती. पर्यटक त्या झोपलेल्या बिबट्याला आरडून ओरडून जागा करण्याचा प्रयत्न करत होते. हे म्हणजे वन्य जीवांना लैच वेळा त्रासदायक असते.कदाचीत हे रोजचेच असल्यामुळे त्या बिबट्याने कुणासही भीक घातली नाही आणि तो आपला निवांत पडून राहिला.अशाप्रकारे त्या राष्ट्रीय वन्यजीव उद्यानात केवळ दोन वन्यजीव पाहून आम्ही जवळच असलेल्या इटाई डोह येथे भेट दिली. हे खूपच सुंदर ठिकाण आहे. विस्तीर्ण निळ्याशार जलसाठ्यात मोठाली दोन तीन बेटे म्हणजे छोटे डोंगरच  ! त्या बेटांच्या टोकावर जाऊन सर्वत्र निरखून पहावेसे वाटले पण ते शक्य झाले नाही, कारण तिथे बोटी होत्या पण बोटीने प्रवास करण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई होती.अर्थात नागझिरा येथिल रेस्टहाउसवर परतलो.

  इथे म्हणजे नागझिरा अभयारण्यात दारू पिण्यास सक्त मनाई असली तरी हवी ती दारू म्हणजे मोह,गावठी, बिअर, व्हिस्की, रम आणि इतर तत्सम प्रकार इथे दुप्पट भावाने मिळतात. आपण निर्व्यसनी असल्यामुळे फक्त एक सिगारेट हॉटेलमालकाच्या परवानगीने ओढली! कारण हॉटेल खाजगी होते, आणि तिथे त्यावेळी केवळ आपण फक्त उपस्थित असल्याने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करू नये-हा नियम आपण मोडला नाही.संध्याकाळी जेवणात मित्रांनी नॉनव्हेज आणि आपण रुचकर व्हेज डिशेस चा मनसोक्त आस्वाद घेतला .सदर जेवणाचे वेळी आपण सोबतच्या पक्षीमित्रास तो कोंबडीचे सुग्रास जेवण घेत असताना, एक प्रश्न विचारला
" कोंबडी हा पदार्थ पक्ष्यांमध्ये मोडतो का? " थोडक्यात पक्षीमित्र लोकांनी कोंबडी खावी किंवा कसे, असा आपल्या बोलण्याचा मतीतार्थ लक्षात घेऊन त्याने या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.  यानंतर गाडीवान आला. त्याने किलोमीटर प्रमाणे ३०० किमीचे अव्वाच्या सव्वा भाडे आकारले, त्याला २४०० रुपये देऊन झाल्यावर ही जी मरतुकडी गाडी आम्हाला घेण्यासाठी पाठवण्यात आली , ती फुकट नव्हती, असे समजले .एकंदरीत आपण त्याचे आभार मानून त्यास पैसे देऊन रवाना केले. दुसऱ्या दिवशी जीप्सीतून सफारी करावयाची असल्याने लवकर झोपी गेलो.

   आम्ही सफारीच्या एकूण तीन ट्रिप्स ठरवल्या होत्या कारण सर्वांना वाघ नामक प्राणी बघावयाचा होता.जेवढ्या जास्त सफारी, तेवढी जास्त वाघ दिसण्याची अधिक शक्यता असते; हे लैच वेळा आपण जाणतोच.नागझिरा येथे सुमारे १० वाघ असल्याचे समजले. त्यात 'डेणू' नामक वाघ अधिक उमदे जनावर आहे. त्याची फ्यामिली ४ लोकांची असून त्याला 'A' MARK नामक वाघीण आणि दोन मुले जय आणि विरू आहेत. 'A'MARK वाघिणीच्या मागच्या डाव्या पायावर A च्या आकाराचे चिन्ह आहे. जय आणि वीरूच्या नावांची उत्पत्ती कशी झाली, ते मात्र समजू शकले नाही.तर आपण पहिल्या सफारीला आपण लैच उत्सुक होतो.जंगल लैच घनदाट असल्याचे ऐकून होतो. कारण मारुती चितमपल्ली, किरण पुरंदरे, दांडेकर आणि तत्सम महान लोक इथे लैच वेळा वास्तव्य करून होते.आणि त्यांनी त्यावर लैच भारी लिहिले असल्याचे आपण सर्वजण जाणून आहोतच.पण वास्तवात आता नागझिरा पूर्वीचा राहिला नाही. विरळ आणि सुकलेले वृक्ष, बऱ्याच ठिकाणी वृक्ष कापलेले आढळून आले. वृक्षांच्या प्रत्येकी दोन रांगांच्या मध्ये एखाद दोन वृक्ष धारातीर्थी पडलेले दिसले. काही वृक्षांची मुळे उघडी पडलेली दिसली; तर काही ठिकाणी वृक्षांच्या मुळाशी खोदकाम केलेले होते .काही झाडांच्या मुळाशी राख दिसत होती. हे सर्व प्रकार नेमके काय आणि कशासाठी आहेत, हे लैच वेळा समजू शकले नाहीत. हा लेख वाचून नागझिरा येथे जाणाऱ्या अभ्यासू लोकांनी याचा लैच वेळा अभ्यास करावा.

                                                                                                                       सांबर

तर दूर एक हरीण दिसले म्हणून आम्ही आमचे क्यामेरे सरसावले आणि फोटो घेतले. नंतर हरणे लैच वेळा शेकड्याने भेटत गेली. मग हरीण, सांबर, चितळ वगैरे किरकोळ वाटू लागले. सांबराच्या जोडीने आपल्याकडे पाहून "ponk sss असा आवाज काढून इतरांना धोक्याची सूचना देऊन जंगलात पळ काढला.प्राणी हे असे इशारे सामन्यतः वाघ, बिबट्या किंवा तत्सम भयावह प्राणी दिसले की मग देतात. सदर सूचनेस लोकल भाषेत "कॉलिंग" म्हटले जाते. काही लोक याला "कॉलिंग अलार्म" म्हणतात.सदर 'पोंक' प्रकाराने सहज मनात विचार आला, आपण एवढे भयंकर आहोत, दिसायला?  नंतर पुढे दुरवर एक मोठा गवा दिसला. लैच दूर असल्यामुळे फोटो घेता आले नाहीत. जे घेतले ते इथे टाकण्याच्या लायकीचे नाहीत.दोन नीलगायी दिसल्या. त्यात एक बैल होता. येथिल भाषेत मादी निलगायीला गऊ आणि नराला निलघोडा म्हणतात, असे समजले.

एका ठिकाणी एक मजेशीर दृष्य दिसले. झाडावर बसलेली माकडे झाडाची कोवळी पाने खाली हरणांना देत होती, आणि हरणे ती खात होती. प्राण्यांतील दोस्तीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. स्वजातीय माकडांविषयी द्वेष असणारी माकडे हरणांशी निरपेक्ष मैत्री करतात, हे म्हणजे लैच भारी आहे. कारण भोप्या नावाचा जो माकडांच्या कळपाचा मुख्य असतो, तो त्या कळपातील सर्व माद्यांचा उपभोग घेतो. मात्र इतर नर माकडांना तो तसा घेऊ देत नाही. कधी चुकूनमाकून एखाद्या मादीचा दुसऱ्या एका नराशी संबंध आलाच तर हा त्यांना हाणतो,किंवा मारूनही टाकतो. याच्यापासून दुखावलेले नर नंतर त्या कळपापासून वेगळे होतात, आणि एक वेगळी टोळी बनवतात. त्यांचा एक म्होरक्या ते निवडतात. आणि पूर्वीच्या कळपाचा मुख्य जो भोप्या, त्याला मारून टाकतात. आता नवीन म्होरक्या असतो,आणि नवीन राज्य असते. तो सुद्धा पूर्वीच्याच नराचा कित्ता गिरवू लागतो. आणि  पुनः तेच दुष्टचक्र चालू राहते.

एका टाक्याजवळ काही वानरे पाणी पीत होती. आणि अचानक दुरवर काही दिसले
"ते पहा"
"काय हाये "
"वाघ रस्त्यावरून चालून राहिलेत "
"छ्या, छ्या! वाघ कसे चालतील रस्त्यावर? लैच दूर हाये.."
"इकडेच येताहेत, ७-८ वाघांची टोळीच आहे "
                                                                                                         वाईल्ड डॉग्ज

आम्ही क्यामेरे सरसावून बसलो . ती टोळी पाण्याच्या टाक्याकडे आली तशी माकडे दूर जाऊन बसली. ते जंगली कुत्रे होते. एकेक करत सावधपणे पुढे आले. त्यातील एकाने टाक्यात उडी घेऊन अंग भिजवून घेतले. मग निवांत पाणी प्यायला. मग आणखी दोघे पुढे आले. त्यातील एक लैच घाबरत होता, म्हणून बाकीचे त्याच्याजवळ थांबले. आम्ही अगदी दहा फुटावर होतो,म्हणून तो आमच्याकडे संशयाने पाहत दोन घोट पाणी प्यायला आणि मग ती टोळी झाडीमागे पसार झाली. यांचे मात्र चांगले फोटो घेता आले.

"एकवेळ वाघ दिसेल, पण वाईल्ड डॉग दिसणे अवघड असते. मी सुद्धा आज पहिल्यांदाच पाहिला." पक्षीमित्र म्हणाला
"अच्छा ,अच्छा !"
"यांना वाघ सुद्धा घाबरून असतात, कारण हे टोळ्यांनी हल्ला करतात. काही ठिकाणी तर यांच्यामुळे वाघ आपला एरिया सोडून जातात."


                                            १) टायगर फ्यामिलीने मारलेला गवा
                                            २) गरुड ( mountain hawk eagle)



थोडे आणखी पुढे गेल्यावर एका ठिकाणी कॉलिंग झाल्याचे समजले म्हणून थांबलो. तिथे सांबर होते आणि त्याचा पोंक पोंक आवाज घुमत होता. आता डेणू दिसणार, अशी खात्री वाटू लागली. अजिबात आवाज करू नका, असे गाईडने फर्मावले म्हणून  आम्ही ती जंगलाची शांतता अनुभवत बसलो. अधुनमधून पक्षांचे आवाज फक्त ..पाचोळ्याची सळसळ. आणि डेणू ची वाट बघत बसलो. इतक्यात आमच्या मागून एक गाडी आली त्यांनी "काय"? असा हाताने इषारा केला. आपण "कॉलिंग" असे उत्तर दिल्यावरून ते सुद्धा क्यामेरे सरसावून बसले, अगदी जिज्ञासायुक्त शांततेचा अनुभव म्हणजे लैच भारी प्रकार होता. पाठीमागे थांबलेले लोक थांबून थांबून एकंदरीत वैतागले आणि आमच्या पुढे निघून गेले. आमच्या पुढच्या सुद्धा दोन गाड्या वैतागून गेल्या. मग आमच्यात सुद्धा हळूहळू कुजबुज सुरु झाली. संतोष नावाच्या त्या गाईडने सांगीतले की परवाच याच ठिकाणी डेणू त्याच्या गाडीवर धावून आला होता. त्याचे असे झाले की डेणू दिसला म्हणून तिथे ५-७ गाड्या जमा झाल्या. एकंदरीत डेणूला गाड्यांचा आवाज सहन होत नाही. ५-७ गाड्यांमधून ३०-३५ लोकांचे आवाज आणि गाड्यांची घरघर यामुळे केवळ १०० फुटावर असलेल्या डेणूला लैच संताप आला आणि तो अगदी ५-७ सेकंदात रस्त्यावर धावत आला मागील पायावर उभे राहून गाडीवर दोन फुटापर्यंत धावत आला. बघणारे सगळे थिजून गेले. पुतळे होऊन गेले. आणि हातातील लैच भारी क्यामेर्यांचा उपयोग होऊच शकला नाही. कारण तो विजेसारखा आला आणि तसाच निघूनही गेला. एकंदरीत बोंबलत बसण्याशिवाय कुणाजवळ पर्याय उरला नाही.

या प्रसंगाची पुनरावृत्ती व्हावी म्हणून आम्ही तिथे लैच वेळा डेणू महाराजांची प्रतीक्षा केली, पण ते काही प्रसन्न झाले नाहीत. मात्र दुरवर सांबर दिसत होते आणि कॉलिंग सुरु होते. धीर न ठेवल्याने आम्ही तेथून पुढे गेलो. आमच्या मागे दुसरी एक लीनोवो नामक गाडी येऊन थांबली. मात्र आम्ही पुढे निघून गेलो. परत येताना ती गाडी आम्हाला परत भेटली त्यातील व्यक्तीने आपल्याला 'डेणू' दिसल्याचे सांगीतले . आम्ही तेथून निघुन गेल्यावर केवळ २-३ मिनिटांनी ! आता याला लैच वेळा योगायोग म्हणावे की 'लक' ते समजले नाही. 'तरी आपण सांगत होतो, थांबा थोडे म्हणून 'असे एकमेकांना दोष देत आम्ही तंबूत परतलो. पण निदान इथे वाघ अस्तित्वात आहे,एवढे तरी समाधान मनाला होते. परत येताना एका टाक्यावर एक गरुड बसलेला होता. तो mountain hawk eagle होता.

हा बिचारा उन्हाने लैच थकलेला होता, आणि मोठ्या कष्टाने अधुनमधून घोटभर पाणी पीत होता. एकंदरीत फारच डीहायड्रेटेड होता. एरवी हवेतल्या हवेत शिकार करणाऱ्या या गरुडाजवळ किरकोळ चिमण्या आणि इतर पक्षी शेजारी बसून पाणी पीत होते. तेथेच तीन सांबर आले.आणि एकाने बिचकत बिचकत थोडे पाणी प्राशन केले, तर बाकीचे दोन आम्हाला पाहून झाडीत गायब झाले.आणि अजून एक सफारी शिल्लक होती. आम्हाला उद्या वाघ हा कोणत्याही परिस्थितीत दिसणार होताच. कारण इथे एकूण दहा वाघ होते. त्यातील किमान एक दिसायला आमची किंवा वाघाची सुद्धा काय हरकत असणार?

"आपण सकाळच्या सफारीत वाघ बघितला, की लगेच दुपारी १२ पर्यंत येथून निघू !" एक मित्र म्हणाला
"अरे पण आपले रिझर्व्हेशन रात्रीचे आहे, एवढा वेळ काय करणार ? कुठे थांबणार ?"
"काहीही करू, भटकू इकडे तिकडे पण १२ वाजेशी निघूच. कारण चेक आउट १२ वाजता असते, अन्यथा टेंटचे एका दिवसाचे भाडे वाढेल!"

हे मात्र बरोबरच असल्याने आम्ही एकमताने ते मान्य केले आणि एकमेकांनी कोणी कुठे कसे आणि किती वाघ आजवर पाहिले, याची चर्चा करीत झोपी गेलो. एका मित्राला भीमाशंकरला त्याच्या गाडीला वाघ आडवा आला होता. एकाने ताडोबाला लैच वाघ बघितले होते, तर एकाने मेळघाटला सेन्सस च्या वेळी दहा पाच वाघ बघितले होते आणि आपण सर्कशीत आणि प्राणीसंग्रहालयात हे ओघानेच आले.

सकाळी पाचलाच उठून आंघोळ आटोपून सहा वाजेशी आम्ही सफारीसाठी तयार होतो. आणि चहा वगैरे होईपर्यंत ७ वाजलेच. आज दुसरा गाईड होता याचे नाव राधेशाम होते. याला आपण म्हणालो, बाबारे, ही तिसरी सफारी असून आता तू तरी वाघ दाखव कारण आता लैच बील झाले आहे. टाका नंबर ७ जवळ कॉलिंग झाले असल्याची खबर मिळाली, म्हणून आम्ही गाडी तिकडे वळवली. पशुपक्षी इत्यादींसाठी वनखात्याने ज्या पाण्याच्या टाक्या बनवलेल्या असतात, त्यांना 'टाका' म्हणतात. राधेशाम हा लैच हुषार गाईड असल्याचे आमच्या लक्षात आले. रस्त्याने जाताना त्याने अचानक ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा आदेश दिला. आम्ही लैच उत्साहित झालो.
"वाघ हाये का?"
'हळू बोला, किल झाली हाये. ताजीच दिसते!" तो कुजबुजला
"किल?"
"हा दाखवतो ,गाडी रिव्हर्स घेऊ"

रस्त्यापासून जेमतेम फक्त २० फुटावर एक गायीएवढा गवा मरून पडलेला होता. त्याच्या मानेचा पोटाचा आणि मांडीचा बराचसा भाग खाऊन टाकलेला होता. लालभडक मांस दिसत होते, म्हणजे सकाळी सकाळी त्याची शिकार झाली होती. जवळपास ३०-३५ किलो मांस खाऊन टाकलेले असावे. म्हणजे ही वाघाच्या पूर्ण फ्यामिलीने केलेली शिकार होती. आम्ही त्या शहीद गव्याचे फोटो घेतले. ही शिकार अर्थातच डेणू आणि त्याच्या फ्यामिलीने केलेली होती. आम्ही तेथे लैच वेळ थांबलो. पण वाघ काही येईना.
"आपल्याला वाटते, तो बहुतेक झोपला असावा. कारण त्याला हे खाऊन सुस्ती आली असेल"
"बरोबर आहे. पण आसल जवळपास नक्कीच" गाईड म्हणाला.
आम्ही झाडीच्या आत नजर पोचेल तिथे बघू लागलो, पण दिसेना काही.. अगदी शांतता....शांततेचे जाणवणे हाच शांततेचा आवाज असतो का? लैच वेळा हा प्रश्न पडून गेला.
"पेर्ते व्हा " पावशाचा आवाज ...मनात म्हटले बाबा, भर उन्हाळ्यात आता काय पेरावे या भकास होत चाललेल्या जंगलात? दूरदूरपर्यंत फक्त सुकलेल्या झाडांची एक विरळ भिंत उभी असल्याचा भास होत होता. गाईड म्हणाला की त्याच्या लहानपणी मारुती चितमपल्ली येथे राहून गेले. ते याला चोकोलेटस् द्यायचे आणि अख्ख्या जंगलात पायी भटकायचे.
"त्यावेळचे जंगल असेच होते का?" आपण विचारले
त्यावर तो म्हणाला " नाही साहेब, आता १० % सुद्धा जंगल उरले नाही..."
एकंदरीत मारुती चितमपल्ली , व्यंकटेश माळगूळकर , आणि अलीकडे किरण पुरंदरे यांनी वर्णन केलेला निसर्ग आणि तेथिल जीवन आज इथे आपल्याला नक्कीच आढळले नाही.हे खेदाने नमूद करावेसे वाटते. इथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे, येथिल आदिवासींचे जीवनमान उंचावले आहे. मात्र नागझिरा लैच ओकाबोका आणि हतबल वाटला.इथे ऐन, सप्तपर्णी,वंश,धावडा, अशी झाडे मुख्यत: आहेत. पण एकंदरीत जंगल माणसांनी कापून खाल्लं आहे.

"तो बघा..डेणूच आहे." गाईड कुजबुजला "झोपलेला आहे, त्या तिथे बघा सरळ माझ्या बोटाच्या समोर - ते तेंदूच्या झाडाच्या बाजूला .."
"अरे हो, खरेच की " एक मित्र
"च्यायला दिसतेय हं काहीतरी पाठमोरा झोपला आहे." दुसरा मित्र
"काळपट पाठ हाये का?" तिसरा!
"थांबा क्यामेरात घेतो " पक्षीमित्र म्हणाला. मग त्याने २६ एक्स झूम करून दाखवले. कोणतातरी पाठमोरा प्राणी झोपलेला होता. मुळात पिक्सेल एवढे फाटले होते, की तो एखादा प्राणी तरी आहे का नाही ,की मुंग्यांचे वारूळ होते,समजेना.
'समजत नाही राव.."
"पण वाघच हाये तो"
"काय की बुवा"
"मला  पण दिसेना राव" एक मित्र म्हणाला .त्यामुळे आपल्याला थोडे हायसे वाटले. कारण एकतर आपल्याला चष्मा असल्याने आपल्या चष्म्यावर त्याचा दोष गेला असता. थोडक्यात आमच्यापैकी तिघांनी वाघ दिसला आणि तो वाघच होता, हे खात्रीने सांगीतले. एकाने आपण वाघासारखे काहीतरी पाहिले असे सांगीतले.तर आपल्यासह उरलेल्या दोघांनी आपणास काहीच दिसले नाही, असे घोषित केले. कारण वाघ जर झोपलेला होता, तर तो अजूनही तेथेच असायला हवा होता. पण आता तो गाईडला सुद्धा दिसेना. एकंदरीत हे प्रकरण संशयास्पद होते.
"पण संध्याकाळी डेणू पाच वाजेला इथे किलजवळ नक्की येणार " इति गाईड .
त्याचे हे म्हणणे मात्र पटले कारण त्याला भूक लागली की तो इथे येणारच होता. पण ही तिसरी सफारी असल्याने आणखी एक सफारी वाढवणे म्हणजे आणखी एक दिवस पांढरा हत्ती पोसणे ठरले असते. एकूण बिल ६ जणांत जवळपास २४००० झाले होते, म्हणजे प्रत्येकी ४००० खर्च दीड दिवसांत आतापर्यंत झालेला होता. त्यात  २००० रुपयांचे तर मिनरल वाटरच संपवले होते.

एकंदरीत येथून वैतागून आम्ही दुसऱ्या स्पॉटकडे निघालो. एका ठिकाणी वानराचा कॉलिंग अलार्म झाला म्हणून थांबलो. दुसऱ्याच क्षणी एका झाडावर ते वानर आणि त्या पाठोपाठ बिबट्याची उडी एका फांदीवरून अत्यंत चपळाईने घेतलेली उडी...वानराची एक अर्धवट किंचाळी...मग सारे शांत झाले. बिबट्याने वानराची शिकार केली होती.हा एक चित्तथरारक क्षण होता. इथेही क्यामेरा निरुपयोगी ठरला. कारण  तो विजेसारखा चमकून गेलेला क्षण निसटून गेला..

परतीच्या वाटेवर एक सर्पगरुड झाडावर समाधी लावून बसलेला दिसला. अगदी निवांत. मस्त आरामात होता. त्याचे मनसोक्त फोटो घेतले. हळद्या लैच वेळा दिसला, सुतारपक्षी, रॉकेट टेल, स्ट्रीपड बर्डस, किंगफिशर, हरियाल, असे अनेक पक्षी दिसले. हा प्रदेश पूर्वी हत्तींसाठी प्रसिद्ध असावा. कारण संस्कृतमध्ये हत्तीला नाग हा शब्द आहे. आज तिथे आपल्याला एकच हत्ती दिसतो -पाळलेला आणि साखळदंडांनी बांधलेला !

कच्च्या रस्त्यावरील धुळीने चांगल्या कपड्यांची वाट लावून टाकली. आणि चेहऱ्यावर धुळीचा थर साचला होता. मुक्कामावर परतल्यावर पुन्हा एकदा अंघोळ केली .थोडी हुरहूर आणि खंत वाटत राहिली. म्हणून त्या परिसराचे जमतील तेवढे फोटो घेतले. नागझिरा सोडताना  मनातल्या मनात म्हणालो, " आपण इथे लैच वेळा पुन्हा येऊ !"

- फेस बुके
facebookay55@gmail.com
copyright (c) all rights reserved 


6 comments:

  1. एका ठिकाणी एक मजेशीर दृष्य दिसले. झाडावर बसलेली माकडे झाडाची कोवळी पाने खाली हरणांना देत होती, आणि हरणे ती खात होती. प्राण्यांतील दोस्तीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. स्वजातीय माकडांविषयी द्वेष असणारी माकडे हरणांशी निरपेक्ष मैत्री करतात, हे म्हणजे लैच भारी आहे.

    वाऽऽऽऽ!!!!

    ReplyDelete
  2. @संजय बर्वे, मनापासून आभार !

    ReplyDelete
  3. khup mast lihilay warnan w sarwaat aawadleli ole mhanje ithe laich wela parat yaychay.....

    ReplyDelete
  4. क्या ब्बात है, गुरुदेव ! आपण सुद्धा व्यंकटेश माडगुळकर आणि मारोतराव चितमपल्लींच्या पुस्तकात बसून लैच वेळा नागझि-याला गेलेलो आहोत. पण तुम्ही दाखवला तसा बराचसा विनोदी आणि बराचसा विषण्ण नागझिरा आपल्याला कधी भेटला नव्हता. लैच वेळा ह्याट्स ऑफ टू युवर लेखनशैली !

    ReplyDelete
  5. धन्यवाद बालाजी !

    ReplyDelete